पोर्णिमेचा प्रकाश

एकोणीसशे चौऱ्याऐंशी सालीच्या ऑगस्ट महिन्यात आमचे व्हेटरनरी कॉलेजचे फर्स्ट सेमिस्टरचे क्लासेस चालू झाले तेंव्हा मला आमची परभणीच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयाची इमारत खूपच आवडली आणि त्यात पुन्हा आमची फर्स्ट इअरची क्लासरूम पाहिल्यावर तर मला खूपच आनंद झाला! पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या फर्स्ट सेमिस्टरमध्ये आम्हाला पशुवैद्यकीचे बेसीक सबजेक्ट्स होते. त्यामधला Veterinary Physiology हा आमच्या डॉ. सतीश बापट सरांचा विषय म्हणजे प्राण्यांचे प्रेक्षकांच्या शास्त्र. आपण पशुधन म्हणून संबोधित असलेल्या गाई म्हशी,बैल आणि घोडा या प्राण्यांच्या शरीरातल्या विविध अवयवांची कामे कशी चालतात हे समजावून सांगणारा हा विषय. मी शाळेत शिकत असताना आम्हाला 'संप्रेरके' नावाचा एक विषय होता. आपल्या शरीरातील अवयवांच्या कामकाजामध्ये प्रत्यक्ष भाग न घेता या संप्रेरकांच्या फक्त उपस्थितीत आपले अवयव व्यवस्थित काम करतात, अशी कांहीशी संप्रेरकाची व्याख्या आमच्या त्यावेळीच्या पाठ्यपुस्तकात देण्यात आली होती असे मला आठवते. या संप्रेरकांना इंग्रजीत हार्मोन्स असे म्हणतात. पाळीव प्राण्यांच्या शरीरातील अशा हार्मोन्सचा अभ्यास करण्यासाठी त्यावेळी आम्हाला Endocrinology नावाचा एक स्वतंत्र विषय होता आणि हा विषय आम्हाला डॉ सतीश देशपांडे सर शिकवीत असत. प्राण्यांच्या शरीर रचनेचा अभ्यास करण्यासाठी त्यावेळी आम्हाला Veterinary Anatomy नावाचा आणखी एक विषय होता आणि हा विषय आम्हाला डॉ शिंगटगेरी नावाचे एक वयस्कर प्रोफेसर शिकवीत असत. बोलताना प्रत्येक वाक्यात एक विशिष्ट असा झटका देत बोलण्याची आमच्या शिंगटगेरी सरांची सवय आजही माझ्या स्मरणात आहे. याच वेळी बहुदा आम्ही सेकंड इअरला आल्यावर आम्हाला एक Animal Production नावाचा विषय होता. पाळीव प्राण्यांच्या व्यवस्थापनासंबंधीचा हा विषय असल्याने मला तर हा विषय त्यावेळी अतिशय सोपा वाटत असे आणि हा विषय शिकविण्यासाठी आम्हाला डॉ औरादकर नावाचे एक उमद्या स्वभावाचे प्रोफेसर असल्याने या विषयाचे लेक्चर्स अटेंड करताना आणि परिक्षेच्या वेळी अभ्यास करतानाही मला अतिशय मजा वाटत असे. पुढे आम्ही सेकंड इअरला आल्यावर हा विषय आम्हाला डॉ. गद्रे सरांनी शिकवला. या Veterinary Anatomy या शरीर रचना शास्त्राच्या जोडीलाच त्यावेळी आम्हाला प्राण्यांच्या शरीरातील हाडांची माहिती देणारा Osteology नावाचा आणखी एक विषय होता आणि हा विषय आम्हाला डॉ एन बी भोसले सर शिकवीत असत. आमचे हे भोसले सर अहमदपूर ते गंगाखेड रोडवरील 'इसाद' या गावाचे रहिवासी असल्याने उदगीरहून निघणाऱ्या उदगीर ते जिंतूर या गाडीने आम्ही परभणीला जात असताना राणी सावरगाव च्या पुढे असलेले हे 'इसाद' गाव आम्हाला रस्त्यात लागले की प्रत्येकवेळी आम्हाला आमच्या एन. एस भोसले सरांची आठवण येत असे.

आम्ही व्हेटरनरी सेकंड इअरला आल्यावर आम्हाला बहुदा तिसऱ्या सेमिस्टरला Genetics and Animal Breeding या एका अतिशय खतरनाक म्हणावे अशा विषयाची ओळख झाली. हा विषय शिकवायला सुरुवातीला आम्हाला डॉ. एक.डी. देशपांडे सर होते. आमच्या या डॉ ए.डी. देशपांडे सरांचा स्वभाव थोडासा विनोदी असल्याने ते आमची दैनंदिन हजेरी घेताना आम्हा वर्गमित्रांची नावे मोठ्याने उच्चारीत तेंव्हा ते आम्हां विद्यार्थ्यांच्या धावांवर नेहमीच विनोद करत असत. माझे वर्गमित्र डॉ कमलाकर माने यांचा रजिस्ट्रेशन नंबर बहुदा 84V42B असा होता तर माझा रजिस्ट्रेशन नंबर 84V45B असा होता. आमच्या माने साहेबांचे नाव उच्चारताना आमचे ए.डी. देशपांडे सर नेहमीच माने साहेबांच्या नावासोबत 'कोई माने या ना माने,' असे हमखास म्हणत त्यामुळे आमच्या वर्गात खसखस पिकत असे. त्यावेळी आमच्या वर्गात एक भुजंग आडनावाचाही विद्यार्थी होता. त्याचे नाव उच्चारताना मात्र आमचे एक. डी. देशपांडे सर 'आले का बिळाच्या बाहेर?' असा प्रश्न विचारीत तेंव्हा आम्हाला आणखी हसू फुटत असे.

आम्ही परभणीला नवीनच असताना फर्स्ट इअरला आम्हां प्रत्येक दहा विद्यार्थ्यांच्या मागे एक प्रोफेसर Advisor म्हणून दिले जात. त्यावेळी Genetics and Animal Breeding या विषयाचेच डॉ. के. एस. देशपांडे सर मला Advisor म्हणून होते आणि आम्हाला सेकंड इअरला Genetics and Animal Breeding हा विषय शिकवायला नेमके डॉ. के एस. देशपांडे सरच आले तेंव्हा मला खूप आनंद झाला परंतु आमचे के एस देशपांडे सर एवढ्या हळू आवाजात शिकवत की त्यांचा आवाज ऐकण्यासाठी आम्हाला आमच्या कानात प्राण आणून त्यांच्या आवाजाकडे लक्ष द्यावे लागत असे. त्यातही आमचे के एस देशपांडे सर त्यांच्या अतिशय हळू आवाजात आम्हाला शिकवत असताना ते जेंव्हा मध्येच थांबून 'Somebody is making noise, असे म्हणत तेंव्हा मात्र आमचे चेहरे बघण्यासारखे होत असत!

त्याचवेळी आम्हाला Veterinary Microbiology हा विषय शिकवायला डॉ मोहम्मद अजीज सर येत असत. धिप्पाड शरीर आणि कुरळे केस असणाऱ्या आमच्या अजीज सरांचा आवाज मात्र अतिशय नाजूक, एखाद्या अतिशय नाजूक तरुणीसारखाच होता. Veterinary Bacteriology चा पिरेड घेत असताना आमच्या अजीज सरांची त्यांचा उजवा कान सतत खाजविण्याची सवय मात्र मला आजही आठवते. याच दरम्यान कधीतरी आम्हाला Veterinary Virology हा विषय शिकवायला डॉ. अनील बन्नाळीकर सर आले आणि त्यांनी त्यांच्या पहिल्याच लेक्चरमध्ये आम्हां विद्यार्थ्यांची मने जिंकली! आमच्या बन्नाळीकर सरांचे लेक्चर म्हणजे आम्हाला सिंहगड एक्सप्रेस ने प्रवास केल्यासारखे वाटे परंतु सरांची आम्हां विद्यार्थ्यांना विषय समजावून सांगण्याची पद्धत एवढी उत्कृष्ट होती की पुढे लवकरच मला Veterinary Virology हा विषय अतिशय आवडू लागला. त्यावेळी आमच्या वर्गात रापिकवाड नावाचा एक आदिवासी समाजाचा नांदेड जिल्ह्यातला विद्यार्थी होता. अभ्यासात कच्च्या असणाऱ्या या विद्यार्थ्याने आमच्या तोंडी परिक्षेत एकदा धमाल उडवून दिली होती. त्यावेळी आमच्या Veterinary Virology या विषयात एक Swine Fever नावाचा धडा होता आणि आमच्या तोंडी परिक्षेच्या वेळी आमच्या बन्नाळीकर सरांनी या रापिकवाड नावाच्या विद्यार्थ्याला What is Swine Fever?' असा प्रश्न विचारला असता आमच्या रापिकवाडने कपाळावर आठ्यांचे जाळे आणून अतिशय आत्मविश्वासाने जेंव्हा Sir, It is nothing but Hog Cholera!' असे उत्तर दिले तेंव्हा आमच्या बन्नाळीकर सरांना ही हसू आवरता आले नाही! याचवेळी आमच्या अभ्यासक्रमात Dairy Science नावाचा एक विषय आला होता आणि हा विषय शिकविण्यासाठी आम्हाला डॉ. बेग नावाचे एक अतिशय प्रेमळ स्वभावाचे प्रोफेसर आले होते. आमच्या बेग सरांनी त्यावेळी आम्हाला हा विषय इतक्या चांगल्या रीतीने समजावून सांगितला होता की पुढे १९९१ साली मी एमपीएससीची परीक्षा देताना माझा ऐच्छिक विषय म्हणून याच विषयाची निवड केली आणि एमपीएससीच्या अगदी पहिल्याच प्रयत्नात माझी वित्त व लेखा अधिकारी म्हणून निवडही झाली.

याच दरम्यान पुढे आम्ही पाचव्या सेमिस्टरला आल्यावर आम्हाला Veterinary Pathology या विषयाची ओळख झाली. हा विषय शिकविण्यासाठी सुरुवातीला आम्हाला डॉ देगलूरकर सर येत असत. आमच्या या देगलूरकर सरांना त्यावेळी कुठलेतरी एक विशिष्ट पान खायची सवय होती त्यामुळे आमचे देगलूरकर सर लेक्चर घेण्यासाठी आमच्या लेक्चर हॉलमध्ये आले की त्या पानाचा एक आनंददायी सुगंध साऱ्या वर्गात पसरत असे आणि त्याच आनंदात आमच्या देगलूरकर सरांचे लेक्चर कधी संपले, हेही आम्हाला समजत नसे!

पुढे चालून आमचा Veterinary Pathology हा विषय शिकविण्यासाठी आम्हाला डॉ.जी.बी. कुलकर्णी सर आले. आमचे जी बी. कुलकर्णी सर आम्हाला हा विषय इतक्या सुंदर रितीने शिकवत की या विषयाचा अभ्यास करताना आमच्या मनावर कधीही ताण आला नाही. आम्ही सेकंड इअरला आल्यावरच आमच्या अभ्यासक्रमात Veterinary Parasitology नावाचा आणखी एक विषय होता. हा विषय शिकविण्यासाठी आम्हाला डॉ. उमाकांत शास्त्री सर, डॉएम एस देशपांडे सर आणि डॉ पी डी. देशपांडे सर हे तीन प्रोफेसर्स होते. यांपैकी डॉ. एम एस देशपांडे सर हे सिनिअर प्रोफेसर होते तर डॉ. पी.डी. देशपांडे सर त्या काळात बहुदा नव्यानेच Associate professor झाले होते. डॉ. उमाकांत शास्त्री सर हे आमच्या उदगीरचेच रहिवासी असल्याने आम्हाला त्यांच्याविषयी विशेष जिव्हाळा वाटत असे. आमचे एम एस देशपांडे सर बहुदा पूर्वी कधीतरी Veterinary Osteology हा विषय शिकवीत असताना त्यांच्या तोंडून वारंवार fossa या शब्दाच्या होत असलेल्या उच्चारामुळे आमच्या सिनिअर्सनी त्यांचे Fossa Sir असेच नामाभिदान केले होते. वास्तविक मानवी किंवा प्राण्यांच्या भागावरील खोलगट भागाला 'फोसा' असे म्हटले जाते परंतु आमच्या सिनिअर मुलांनी विनाकारणच या शब्दाला विकृत स्वरूप आणून ठेवले होते त्यामुळे नंतर येणाऱ्या प्रत्येक बॅचमध्ये हा शब्द प्रचलित होत होता.

पुढे आम्ही सातव्या सेमिस्टरला येण्यापूर्वी आमच्या सिनिअर मुलांनी आम्हाला Veterinary Gynaecology या विषयाची तोंडओळख करून दिली आणि त्याचवेळी Pregnancy Diagnosis ऊर्फ PD या प्रकाराचेही महत्व समजावून सांगितले. मी दहावीला आल्यावर उदगीरच्या खानगा गल्लीत आमच्या वडिलांनी श्री. बाबुराव सताने यांच्या घराचे करारपत्र करून घेतले होते आणि आम्ही या खानगा गल्लीतील 'सतानेच्या वाड्यात' रहायला आलो होतो. श्री बाबूराव सताने यांच्या या घरातून मी दररोज शाळेकडे जाताना वाटेत शासनाचे एक आधारभूत केंद्र लागत असे. या आधारभूत केंद्राच्या पुढे एक जनावरांना उपचार करताना अडकावयाचा एक सापळा उभा केलेला होता. आमच्या पशुवैद्यकीय भाषेत त्याला 'ट्रेव्हीस' असे म्हणतात. मी आमच्या शाळेत येता जाता बऱ्याच वेळा मला या ट्रेव्हीसमध्ये गाभण गाई-म्हशी थांबलेल्या आढळून येत असत आणि त्या आधारभूत केंद्रातले पशुवैद्यक त्या गाभण गाई-म्हशींच्या ढुंगणात हात घालून कांहीतरी चाचपडत असल्याचे त्यावेळी माझ्या निदर्शनास येत असे. मला त्यावेळी हा प्रकार अतिशय किळसवाणा वाटत असे परंतु माणसांचा डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मला पुढे भविष्यात असला काही प्रकार करावा लागेल असे मला त्यावेळी स्वप्नातही वाटले नव्हते!

आमच्या सातव्या सेमिस्टरला आम्हाला हा Veterinary Gynaecology विषय होता आणि हा विषय शिकवायला आम्हाला अतिशय कडक स्वभावाचे डॉ. पारगावकर सर होते आणि त्यांना आम्हा विद्यार्थ्यांकडून अचूक पीडीची अपेक्षा होती, असे आमच्या सिनिअर्सनी आम्हाला सांगितले असल्याने आम्ही सहाव्या सेमिस्टरला असतानाच आमच्या ह असे आमच्या न्यू व्हेटरनरी हॉस्टेलच्या जवळून पुढे रायपूरला गेलेल्या रस्त्यावरील आमच्या कॉलेजच्या रेड कंधारी कॅटल फार्मवर आम्ही 'पीडी' प्रॅक्टिस करण्यासाठी दररोजच संध्याकाळी जावू लागलो आणि आम्हाला आत्मविश्वास येईपर्यंत आम्ही पीडीची प्रॅक्टिस करीत राहिलो हा PD उर्फ Pregnancy Diagnosis चा प्रकार म्हणजे एखादी गाय अथवा म्हैस गाभण आहे किंवा नाही हे तपासावयाचे एक तंत्र असते आणि साधारणतः एखादी गाय किंवा म्हैस गाभण राहिल्यावर तीन महिन्यांनी आपल्याला त्या गाईच्या अथवा म्हशीच्या गुद्वारातून हात घालून त्या गाईचे वा म्हशीचे गर्भाशय चाचपून आपल्याला तिच्या गर्भधारणेचा अंदाज काढता येतो. आमच्या या Veterinary Gynaecology विषयाचे लेक्चर्स घेताना आमचे पारगावकर सर त्यांच्या हॉलंड मधील वास्तव्याचे बरेचसे अनुभव आम्हाला सांगत असत आणि त्यांच्या या वैशिष्ट्यपूर्ण शिकवण्यामुळे आम्हाला त्यांचा विषयही खूप चांगल्या रीतीने समजत असे. पुढे आम्हाला हा विषय शिकविण्यासाठी डॉ बक्षी सरांची नियुक्ती झाली आणि त्यांनीही अतिशय प्रभावीपणे आम्हाला हा विषय शिकविला. आम्ही बहुदा सातव्या सेमिस्टरला असतानाच आमच्या अभ्यासक्रमात Veterinary Medicine आणि Veterinary Surgery हे विषय आले. यातला Veterinary Medicine हा विषय शिकविण्यासाठी आम्हाला डॉ. अनंतवार सर होते परंतु पुढे थोड्याच दिवसांत आम्हाला हा विषय शिकविण्यासाठी हरियाणा राज्यातले डॉ. भूपसिंग सर आले. या दोघांनीही आम्हाला Veterinary Medicine हा विषय अतिशय सुंदररित्या शिकविला. हे दोनच विषय पुढे आम्हाला फिल्डवर काम करण्यासाठी अतिशय महत्वाचे असल्याने आम्ही फायनल इअरला आल्यावर या दोन विषयांचा अतिशय गंभीरपणे अभ्यास केला. आम्हाला Veterinary Surgery हा विषय शिकविण्यासाठी डॉ अरूण भोकरे नावाचे प्रोफेसर होते. गंभीर व्यक्तिमत्त्व असलेल्या आमच्या डॉ. भोकरे सरांना पाहताच आमच्या मनात त्यांच्याविषयी एक भितीयुक्त आदरभाव आपोआपच तयार झाला होता परंतु असे जरी झाले असले तरी आमच्या भोकरे सरांनी पुढे आमचे Veterinary Surgery चे लेक्चर्स प्रत्यक्ष घ्यायला सुरुवात केली तेंव्हा त्यांच्याविषयी आमच्या मनात असलेली भिती कुठल्याकुठे पळून गेली आणि Veterinary Surgery या विषयात आम्हाला खूप रस वाटू लागला! पुढे डॉ उस्तुर्गे सरांनी काही दिवस आमचे Veterinary Surgery या विषयाचे लेक्चर्स आणि प्रॅक्टिकलल्स घेतले. आमच्या भोकरे सरांच्या व्यक्तीमत्वानेच प्रभावीत होऊन पुढे आमच्या डॉ दिलिप मोरे या वर्गमित्राने Veterinary Surgery या विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आणि आता तो एक निष्णात Veterinary Surgeon म्हणून बीड जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. याच धर्तीवर आमच्या डॉ. कमलाकर माने या वर्गमित्राने आमच्या पारगावकर सरांचा आदर्श घेऊन Veterinary Gynaecology या विषयाचा पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केला आणि मागील पंचवीस वर्षांपासून ते फिल्डवर पशुधन विकास अधिकारी म्हणून अतिशय आत्मविश्वासाने काम करीत आहेत. मध्ये आमच्या माने साहेबांनी त्यांची सासुरवाडी असलेल्या निलंगा तालुक्यात तब्बल अकरा वर्षे पशुधन विकास अधिकारी म्हणून काम केले, त्यामुळे निलंगा तालुक्यात असा एकही शेतकरी नसेल की जो आमच्या माने साहेबांना ओळखत नाही.

मध्येच आम्हाला थर्ड इअर आणि फायनल इअरला असताना Veterinary Pharmacology नावाचा पशुवैद्यकीय औषधशास्त्र हा विषय होता आणि हा विषय शिकविण्यासाठी आम्हाला सुरुवातीला डॉ. पी. आर. मोरे सर आणि डॉ. वाघ सर होते आणि पुढे हा विषय शिकविण्यासाठी आम्हाला डॉ. वडलामुडी सर आणि डॉ. कुरेशी सर आले. या दोहोतले डॉ. कुरेशी सर हे एक अतिशय विद्वान प्रोफेसर होते आणि ते अतिशय अस्खलितपणे इंग्रजी बोलत असत. पुढे डॉ कुरेशी सरांच्याच मार्गदर्शनाखाली आमच्या डॉ हिरालाल निंबाळकरांनी Veterinary Pharmacology या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले आणि तेही मागच्या पंचवीस वर्षांपासून फिल्डवर अतिशय प्रभावीपणे काम करीत आहेत. लातूर जिल्ह्यातले ते एक अतिशय लोकप्रिय पशुधन विकास अधिकारी आहेत. याचप्रमाणे आमचे वर्गमित्र डॉ किरण पराग यांनी Veterinary Anatomy या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले आणि आता सध्या ते सांगली जिल्हा परिषदेत जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

आम्ही सातव्या सेमिस्टरला आल्यावर आम्हाला Veterinary Extension नावाच्या एका नव्याच विषयाची ओळख झाली. हा विषय शिकविण्यासाठी आम्हाला सुरुवातीला डाखोरे सर जरी आले तरी पुढे आम्हाला हा विषय शिकविण्यासाठी खानदेशातील बहुदा मलकापूरचे रहिवासी असलेले डॉ. बी.एस. महाजन सर आले आणि आमच्या महाजन सरांच्या शिकविण्याच्या अतिशय सुलभ पद्धतीमुळे मला आमचा Veterinary Extension हा विषय भलताच आवडला! कदाचित यामुळेच पुढे १९८८ साली मी आमच्या पशुवैद्यकीय महाविद्यालय Genetics and Animal Breeding या विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी घेतलेला प्रवेश नाकारून एम एस्सी (कृषी विस्तार) या कृषी महाविद्यालयाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आणि दैवयोगाने मला एम एस्सी कृषी विस्तार या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी डॉ बी एस महाजन सर हेच गाईड म्हणून लाभले. आमच्या महाजन सरांनी मला पूर्ण स्वातंत्र्य दिल्यामुळेच पुढे मी एमपीएससीचा अभ्यास करू शकलो आणि अगदी पहिल्याच प्रयत्नात माझी एमपीएससीकडून वित्त व लेखा अधिकारी म्हणून निवड झाली. आम्ही फायनल इअरला असतानाच आमच्या Veterinary Extension Department मध्ये डॉ डी बी शिंदे सर प्रोफेसर म्हणून कार्यरत होते. डॉ डी बी शिंदे सर आमच्या बाळराजेंचे मावसभाऊच असल्याने त्या काळात मला एक मोठेच पाठबळ मिळाले आणि पुढे आमच्या डॉ डी बी शिंदे सरांच्या मेहुणे असलेल्या डॉ. व्ही टी जाधव सरांनीच मला आमच्या कृषी विद्यापीठातील न्यू पी जी हॉस्टेलवर स्वतंत्र खोली दिल्याने माझा चांगल्या रीतीने एमपीएससीचा अभ्यास होऊ शकला आणि मी पुढे एमपीएससीच्या परीक्षेत यशस्वी होऊ शकलो.

कुठलेतरी जन्मोजन्मीचे ऋणानुबंध असल्याशिवाय माणसे आपल्या आयुष्यात येत नाहीत अशी माझी श्रद्धा आहे त्यामुळे आमचे हे सारे प्रोफेसर्स माझ्या आयुष्यात आले आणि त्यांनी माझ्या आयुष्याला दिशा दिली असे मला वाटते.

पोर्णिमेच्या आल्हाददायक चंद्रप्रकाशाचा आम्हा साऱ्यांनाच अनुभव आहे. तद्वतच माझ्या परभणीच्या जवळपास दहा वर्षांच्या वास्तव्यात आमच्या या गुरुजनांनी आम्हाला जे प्रेम आणि जे वात्सल्य दिले त्या प्रेम आणि वात्सल्याला तोड नाही. आमच्या प्रोफेसरांच्या या प्रेम आणि वात्सल्याला मला फक्त पोर्णिमेच्या शीतल आल्हाददायक प्रकाशाचीच उपमा द्यावी असे मलावाटते!

पोर्णिमेच्या या शीतल प्रकाशातच आम्हाला आमच्या जीवनाचा राजमार्ग सापडला.

आज गुरू पौर्णिमा असल्याने माझ्या या साऱ्या गुरुजनांच्या आठवणी माझ्या मनात दाटून आल्या आहेत. माझ्या शालेय जीवनातील असो की महाविद्यालयीन जीवनातील असो, माझ्या गुरूजनांचे ऋण मी या जन्मात तरी फेडू शकणार नाही. त्यासाठी पुढे मला बरेचसे जन्म घ्यावे लागतील!

आज गुरू पौर्णिमेच्या निमित्ताने मी माझ्या गुरूजनांविषयीच्या माझ्या प्रेम भावना व्यक्त कराव्यात म्हणून मी हा लेखनप्रपंच केला आहे. माझ्या अनावधानाने माझ्या या लेखात माझ्या कांही गुरूजनांचा उल्लेख आला नसेल तर त्यांनी मला मोठ्या मनाने माफ करावे!

आज गुरू पौर्णिमेच्या निमित्ताने मी माझ्या सर्व गुरूजनांना आणि माझ्या वर्गमित्रांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो, कृपया साऱ्यांनी माझ्या शुभेच्छांचा स्वीकार करावा अशी माझी सविनय विनंती आहे!