परभणी पशुवैद्यकीय महाविद्यालय चे सुरुवातीचे दिवस


परभणी पशुवैद्यकीय महाविद्यालयाचा सुवर्ण महोत्सव साजरा होत आहे, ते ऐकून मला अतिशय आनंद झाला. त्या निमित्ताने मी तिथे सध्या कार्यरत प्राचार्य, सर्व विभागप्रमुख , प्राध्यापक आणि शिवाय इतर नॉन टीचिंग स्टाफ चे अभिनंदन करतो आणि हार्दिक शुभेच्छा देतो. तसेच सध्या असणाऱ्या विद्यार्थ्यांचेही मनःपूर्वक अभिनंदन करतो. याशिवाय अनेक ठिकाणी विविध पदे भूषविणारे आणि शिवाय विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडून निवृत्त झालेल्या माजी विद्यार्थी मित्रांचेही अभिनंदन करतो.

I joined Parbhani Veterinary college as a student when it was in nascent stage, and it is indeed a great pleasure to know that our college is completing 50 glorious years! These days, due to advent of technology, you can find anything in the world by a search on computer. In those days, before my admission, I had to ask several people, where is Parbhani and how to reach there. Now it has already become a renowned college imparting education in Veterinary and animal science.

मी परभणी पशुवैद्यकीय कॉलेज चा १९७३ ते १९७७ मधे ग्रॅज्युएशन चा आणि नंतर १९७९ ते १९८२ मधे पोस्ट ग्रॅज्युएशन चा विद्यार्थी होतो.अशा तऱ्हेने कॉलेज च्या सुरुवातीच्या काळाचा साक्षीदार या नात्याने मला काही गोष्टींची आठवण होते त्या उद्धृत करत आहे.

वास्तविक मी ज्यावेळी पशुवैद्यक कॉलेज मधे प्रवेश घेतला तोपर्यंत मला 'वेटेरिनरी' या शब्दाचे स्पेलिंग सुद्धा माहित नव्हते. तसे माझ्या बरोबरीच्या बऱ्याच जणांचे असावे ! माझे नाशिक येथील मित्र यांनाही मी नक्की काय शिकणार याची उत्सुकता होती. मराठवाडा कृषी विद्यापीठाचा कॅम्पस भलामोठा होता. मोठे प्रवेशद्वार, मोठ्या इमारती , भलेमोठे वाचनालय, स्पोर्ट फॅसिलिटी, याशिवाय शेतीवाडी, पशुधन ,पोल्ट्री फार्म वगैरे होते. एका बाजूला कृषी महाविद्यालयाची भव्य इमारत होती तर दुसऱ्या बाजूला पशुवैद्यक महाविद्यालय हे अगदी लहानशा जागेत अस्तित्वात होते आणि त्याची इमारत ही माझ्या कल्पनेतल्या कॉलेज मधे अशी बिलकुल बसत नव्हती. लेक्चर हॉल, लॅब्स एकेका छोट्या खोलीत होते. प्राचार्याशिवाय इतर कोणत्याही प्राध्यापका साठी स्वतंत्र केबिन नव्हती.

आमचे हॉस्टेल सुद्धा स्वतंत्र नव्हते. आमचे सकाळचे लेक्चर्स झाले की आम्ही जेवण करून रूम वर जायचो.मात्र त्यावेळी आमचे प्राचार्य श्री करलगीकर यांना सोडून आमच्या कॉलेज च्या कोणत्याही प्राध्यापकांना कॅम्पस मध्ये रहायला निवास नव्हते. सकाळचे तास झाल्यावर घरी जाऊन परत येणे किंवा दुपारचे जेवण बरोबर आणून ते संध्याकाळ पर्यंत काम करायचे. म्हणजे आम्हा विद्यार्थ्यांपेक्षा प्राध्यापकांना अधिक कष्ट सहन करावे लागायचे. परभणीचा उकाडा खूप तीव्र असायचा, अशा वेळी दोन वेळा कॉलेज ला येणे किती अवघड असेल? टू व्हिलर सुद्धा कमी प्राध्यापकांकडे होती. बरेच प्राध्यापक सायकलने येत.परंतु आम्हाला त्यावेळी हे जाणवत होते की हेच प्राध्यापक स्वतः अनेक समस्यांचा सामना करून सुद्धा आम्हाला घडवण्याचे काम करत होते. कदाचित त्यावेळी त्यांचे महत्व तेवढे समजले नव्हते. मात्र आता जेव्हा आम्ही अनेक मॅनेजमेंट च्या पदावर काम करून निवृत्त झालो आहोत तेव्हा प्राप्त परिस्थितीत जे उत्तम कसे करता येईल तसे ते त्यांनी केले हे समजले आहे. कॉलेज यशस्वी करून दाखवायचेच हे बहुधा त्यावेळच्या प्राध्यापकांच्या टीम चे ध्येय असावे. नॉन टिचिंग स्टाफ सुद्धा लहानशा खोलीत विनातक्रार काम करायचा. या सगळ्यांनी त्यावेळी चिकाटीने काम केले त्यामुळेच आपले कॉलेज नावारूपाला आले आहे आणि आज सांगतांना छाती अभिमानाने फुलून जाते की मी त्या कॉलेज चा माजी विद्यार्थी आहे.

हल्लीच्या विद्यार्थ्यांना कदाचित ह्यावर विश्वास सुद्धा बसणार नाही की कधी कधी उघड्यावर आमचे वर्ग भरत. त्यावेळी आम्ही तरीही मन लावून ऐकायचो. आमची बॅच ही अर्धे कृषीचे एक वर्ष करून तर बाकी आम्ही इंटर सायन्स करून आलो होतो.त्यामुळे इंग्रजीत होणारे लेक्चर ऐकण्यापेक्षा नोट्स द्याव्या असे कृषी एक वर्ष करून आलेल्यांचे मत असायचे. मग प्रोफेसर्स दोन्हीही करायचे. आम्हाला आयत्या नोट्स पेक्षा पुस्तक वाचून नोट्स काढायला आवडले असते.परंतु नोट्स ला आवश्यक पुस्तकांची वाचनालयातली संख्या तुटपुंजी होती. शिवाय ती पुस्तके बाजारात उपलब्ध नव्हती आणि बाहेरून मागवली तरी सगळ्यांना परवडणार नव्हती. शिवाय त्रयमासिक पद्धती मधे विषय प्रत्येक सत्रात बदलायचे. हळूहळू आम्हीही ह्या पद्धती ला अड्जस्ट झालो.

वर्गात मुली नव्हत्या याचा थोडा खेद होता. मला वाटते की मुली बरोबर असल्या की मुले जरा शिस्तबद्ध आणि नीटनेटके वागतात. पण आता विचार केल्यावर असे वाटते की मुली असत्या तर आम्ही जेवढे मोकळेपणाने प्राध्यापकांना ज्या शंका विचारायचो त्या कदाचित विचारू शकलो नसतो.

त्यावेळी मुंबई चे कॉलेज हे खूप छान आहे असे ऐकले होते.अर्थात ते कॉलेज भारतातल्या अगदी सुरुवातीच्या कॉलेज मधल्या कॉलेजेस पैकी एक होते हे निर्विवाद ! मुंबई कॉलेजचा बस स्टॉप सुद्धा बैलघोडा म्हणून कैक वर्षांपासून प्रसिद्ध होता. साहजिकच मुंबई किंवा नागपूर या कॉलेजेस ची त्यावेळी बरोबरी होणे शक्य नव्हते. मात्र मुंबई कॉलेज च्या विद्यार्थ्यांना मोठ्या पशूंच्या क्लिनिकल प्रॅक्टिस साठी आरे मिल्क कॉलनी मधे जावे लागायचे असे समजले. शिवाय एरव्ही त्यांना फक्त कुत्रा या निरुपयोगी प्राण्यावर उपचार करायची संधी मिळायची. त्यामानाने आम्ही अनुभवाने फार समृद्ध होतो. आम्हाला कॉलेजच्या पशूंना नेहमी तपासता यायचे. शिवाय आम्हाला परभणी शहरातल्या हॉस्पिटल मधे किंवा ऍम्ब्युलेटरी क्लिनिक साठी नव्या कोऱ्या बस मधून खेडोपाडी घेऊन जायचे. ह्या खास आमच्या साठी असलेल्या बस मधून ऍप्रन घालून जातांना आम्हाला एक वेगळाच अभिमान आणि आनंद वाटायचा. थेअरी पेक्षा प्रात्यक्षिक अनुभव पुढे आमच्या फार कामास आला. कारण आम्ही प्रत्यक्ष ऑपरेशन करायचो, गर्भ धारणा झाली की नाही ती चिकित्सा करायचो. इंजेक्शन द्यायचो, इंट्राव्हेनस सहजगत्या द्यायचो. आमच्या बस मधे जी औषधे असतील तेवढ्यातच गावात कसे उपचार करता येतील ते पाहायचो. काय नाही त्याचा गवगवा न करता! त्यामुळे सुविधा असण्यापेक्षा अनुभवामुळे आम्ही खरोखर समृद्ध झालो. हे शिक्षण आम्हाला या कॉलेज मधून इथल्या सहृदय प्राध्यापकांकडून मिळाले, त्यानंतर आम्ही जिथे सर्व्हिसला गेलो तिथे आत्मविश्वासाने काम करता आले. कारण प्रॅक्टिकल ज्ञानाची शिदोरी आम्हाला पुरेपूर मिळाली होती त्यांचे उपकार जन्मभर विसरणार नाही.

असे म्हणतात की In college life first you learn, then you take experience but in real life first you experience and then you learn ! मात्र आम्हाला मात्र learning आणि experience दोन्हीही एकाच ठिकाणी मिळाले.

मूलभूत अडचणींचा सामना करत शिक्षण घेत असतांना आम्ही क्रीडा, संगीत आणि सांस्कृतिक क्षेत्रात सुद्धा थोडा शिरकाव करण्याचा प्रयत्न केला. आमची संख्या ही कृषी महाविद्यालयाच्या पेक्षा कमी होती आणि स्पोर्ट साठी त्यांच्या उपलब्ध सुविधांचाच आम्हाला वापर करावा लागायचा कारण शेवटी विद्यापीठ एकच होते. तरीही आम्ही क्रिकेट, बॅडमिंटन ,व्हॉलीबॉल यांची स्वतंत्र टीम बनवली आणि बऱ्यापैकी चांगली स्पर्धा करायचो.

धावण्याच्या शर्यतीत आमच्या कॉलेजचा लक्ष्मण सरकटे आणि खो खो मध्ये रणधीर बारहाते पुष्कळ पुढे आंतर- विद्यापीठ स्पर्धेसाठी गेले होते.रणधीर याची खेळातली चपळाई पुढे त्याला कदाचित संजय गांधी नॅशनल पार्क मधे काम करतांना कामी आली असावी. कारण शहरात मोकळा सुटलेल्या बिबट्याला बाण मारून भुलेचे इंजेक्शन देण्याचे अत्यंत धाडसी काम रणधीर सहजगत्या करत असे, ज्यामधे खूप वेगाने हालचाल करावी लागते. अन्यथा डॉक्टर वर उलट हल्ला होऊ शकतो .

याशिवाय आमच्या कॉलेज मधील तरुण प्राध्यापक डॉ अशोक भालेराव, औरादकर, वादळामुदी , कुरेशी, ए बी देशपांडे वगैरे लोकांच्या सहकार्याने इनडोअर स्पोर्ट्स टेबल टेनिस ,कॅरम ,बुद्धिबळ वगैरे स्पर्धा आयोजित केल्या होत्या. विद्यापीठाच्या सांस्कृतिक कार्यक्रमात, संगीत नृत्यात सुद्धा आमच्या कॉलेजचा सहभाग असे! त्यावेळी नवीन आलेल्या काश्मिरी विद्यार्थ्यांनी सादर केलेले नृत्य तर फारच लोकप्रिय झाले होते आणि त्यामुळे आमच्या कॉलेजची शान वाढली होती. अशा तऱ्हेने विविध उपक्रमात आम्ही आमच्या अस्तित्वाची जाणीव कॅम्पस मधे करून दिली.

परभणी कॉलेज मधून ग्रॅज्युएशन करून मी प्रथम नाशिक पॉलिक्लिनिक मधे म्हणजे महाराष्ट्र सरकारची काही वर्ष नोकरी केली. त्यावेळी असलेले मेडिसिन चे प्राध्यापक भूप सिंग यांना मात्र मी मेडिसिन मधे पोस्ट ग्रॅज्युएशन करावे असे वाटत होते. मग मी पुन्हा एकदा या कॉलेज मधे प्रवेश घेतला. त्या दरम्यान कॉलेज खूप बदलले होते. मी घेतलेल्या मेडिसिन आणि मायनर मायक्रोबियॉलॉजी या विषयाचे प्राध्यापक अत्यंत हुशार तर होतेच त्याबरोबरच त्यांना त्यांच्या बुद्धिमत्तेचा वापर करता येईल असे हॉस्पिटल आणि प्रयोगशाळा त्यावेळी उपस्थित झाल्या होत्या. पोस्ट ग्रॅज्युएशन च्या विद्यार्थ्यांना काम करायला आणि आपली कल्पनाशक्ती ही विविध प्रयोगांसाठी तसेच, डायाग्नोसिस साठी वापरायला पूर्णतः स्वातंत्र्य होते. हे खूप विशेष होते.

पुढे या क्षेत्रात करियर करावे अशी माझी मनीषा होती. मात्र चांगले मार्क मिळूनही लगेच संधी उपलब्ध नव्हती. त्यामुळे मी इन्शुरन्स या क्षेत्रात नोकरी केली. पुढे तिथल्याही उपलब्ध शिक्षणाचा अभ्यास आणि परीक्षा पूर्ण केल्या. एकदा आमच्या कंपनीला वाटले की पशुवैद्यकीय पदवीधराला जर इन्शुरन्सचे आधीच थोडे ज्ञान मिळाले तर चांगले होईल. त्या दृष्टीने मी त्यावेळचे प्राचार्य डा बी बी देशपांडे सर यांच्या परवानगीने फायनल इयर च्या विद्यार्थ्यांना एक लेक्चर दिले. आपल्याच कॉलेज मधे लेक्चर द्यायला मला एक वेगळाच आनंद मिळाला. सर्वांना भेटून बरे वाटले.

एके काळी कुठे आहे परभणी हे मला माहित नव्हते. आता मात्र त्या कॉलेज चा पदवीधर आहे ते सांगायला अभिमान वाटतो. आता तंत्रज्ञान खूप सुधारले, नव्या संधी उपलब्ध झाल्या. त्यामुळे पशुवैद्यक पदवीधरांना खूपच मोठी आव्हाने आहेत. पशुवैद्यकीय सेवा, संशोधन, विमा, बँकिंग, फार्मासिटिकल, भारतीय प्रशासकीय सेवा, पोलीस किंवा इतर कोणतेही क्षेत्र निवडा,कोणत्याही क्षेत्रात परभणी कॉलेज चा विद्यार्थी मागे राहणार नाही याची खात्री आहे.त्यामुळे सर्वांना खूप खूप शुभेच्छा !


दीपक भालेराव

निवृत्त क्षेत्रीय प्रबंधक

द ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी ली