परभणी पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थापनेनंतर: काही आठवणी

डॉ दिवाकर दत्तात्रयराव कुलकर्णी, मांडाखळीकर

MVSc, PhD, FNAVS

माजी विद्यार्थी, माजी फॅकल्टी,

पशुवैद्यकीय व पशुविज्ञान महाविद्यालय, मपमविवि, परभणी

निवृत्त प्रमुख शास्त्रज्ञ आणि पूर्व संचालक,

भाकृअनुप राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संशोधन संस्था, भोपाळ

मोबाईल ९४२५६२४९६४

ddkulkar@gmail.com

जुलै १९७१! पहिला आठवडा! त्यावेळी महाराष्ट्रात फक्त दोन पशुवैद्यकीय महाविद्यालये होती, एक नागपूर आणि एक मुंबई! त्याकाळी BVSc & AH हा पाच वर्षाचा कोर्स होता, त्यातील पहिले वर्ष कृषी आणि पशुवैद्यकीय या दोन्ही शाखांसाठी कॉमन असे. मी नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशासाठी पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला येथे अर्ज पाठवला होता. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात विद्यापीठाकडून मला एक पत्र आले, त्याप्रमाणे मला नागपूर येथे प्रवेश मिळाला होता आणि मी मराठवाड्यातील असल्यामुळे प्रथम वर्ष पंजाबराव कृषी विद्यापीठाचा उपपरिसर असलेल्या परभणी येथील कृषी महाविद्यालयात पूर्ण करण्याबाबत सूचना होती. मी परभणीचाच रहाणार असल्यामुळे ताबडतोब कृषी महाविद्यालयात प्रवेश घेतला.

त्यावेळी एक वर्ष म्हणजे 3 त्रैमासिक सत्रे (Trimester pattern) असे. एक सत्र सर्वसाधारणपणे तीन सव्वा तीन महिन्याचे असे. प्रत्येक सत्रात - विषय आणि प्रत्येक विषयात क्रेडिटप्रमाणे १०-१०% मार्कांच्या दोन क्विझ (एक अन-अनाउन्स्ड आणि एक आधी कळवून) एक मिडटर्म (४०% मार्क) फायनल प्रॅक्टिकल (प्रॅक्टिकल असेल तर एका प्रॅक्टिकल क्रेडिटसाठी वेगळे ५० मार्क) आणि फायनल थिअरी (४०% मार्क)! म्हणजेच + क्रेडिटचा विषय असेल तर १५० मार्क, त्यावरुन टक्केवारी काढावयाची १० ने भागून ग्रेड पॉइंट काढावयाचा. जीपीए, सीजीपीए आणि ही एकूणच पद्धत इतकी नवीन होती की समजतच नसे. तिस-या सत्रात मला आधी टायफॉइड आणि नंतर कावीळ झाल्यामुळे दोन विषयाच्या परीक्षा बुडाल्या आणि प्रथम वर्ष अखेरीस त्या दोन विषयांत मी चक्क नापास झाल्याचा निकाल आला.

त्या दरम्यान काही घटना घडल्या त्या सांगणे क्रमप्राप्त आहे. १९७१-७२ या काळात ना. वसंतराव नाईक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९७१च्या शेवटी मराठवाड्यातील विकास प्रश्नांवर असंघटित रित्या जनतेत असंतोष आणि चळवळीची बीजे मूळ धरत होती आणि १९७२च्या फेब्रुवारी-मार्च- एप्रिल मध्ये मराठवाडा विकास आंदोलन पूर्ण रुपात भरात आले होते. या आंदोलनाचा परिपाक म्हणून मराठवाडा विकासाच्या अनेक योजना कार्यान्वित करण्यासाठी निर्णय करण्यात आले त्यात परभणी येथे मराठवाडा कृषि विद्यापीठ मराठवाड्यासाठी एक पशुवैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याचाही निर्णय झाला आणि त्याची अंमलबजावणी तात्काळ करण्यात येऊन दिनांक १८ मे १९७२ या दिवशी परभणी येथे पशुवैद्यकीय पशुविज्ञान महाविद्यालयाची स्थापना झाली. प्रथम वर्षासाठी जे कृषी महाविद्यालयात शिकत होते त्या मराठवाड्यातील सर्व विद्यार्थ्यांना विकल्प देऊन पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या ३२ जागा भरण्यात आल्या. माझा प्रवेशच मुळात पशुवैद्यकीय शाखेत असल्यामुळे माझे नाव परभणी येथील पशुवैद्यकीय पशु विज्ञान महाविद्यालयात साहजिकच आले. विकल्प मिळाल्यामुळे काही विद्यार्थ्यांनी जरी शाखा बदल करून पशुवैद्यकीय विद्याशाखेत प्रवेश घेतला तरी यात मराठवाड्यातील विद्यार्थी ५०%च्या आसपासच होते, बहुतांश विद्यार्थी शेजारील आंध्र प्रदेशातील होते. महाराष्ट्रातील आठवत असलेली नावे - अब्दुल अझीझ, चंद्रकांत लहानकर, चिंचनसुरे, तलपल्लीकर, खालिद बिन अवाझ, शेख बशीर, अन्वर अली शाह, कलीम अहमद, एस आर मंत्री, दशरथ राजगुरू, व्ही एन झांबरे, व्ही जे हर्षे, सुरेश शहाणे, व्ही एन कुटे .

मी एक ट्राईमिस्टर मागे पडल्यामुळे आमची एक रिपीट बॅच केल्या गेली. यात शेवटपर्यंत टिकून नाव कमावलेले फक्त तीन विद्यार्थी होते मोहमद मेहमूद अली, मीर वजाहत अली आणि अस्मादिक. हे इतर दोघेही आंध्रातून आले होते. डिग्री पूर्ण करतांना रेग्युलर बॅचमधून डॉ अब्दुल अझीझ आणि रिपीट बॅचमधून मेहमूद अली पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले.

प्रथम वर्ष पूर्ण वेळेवर केल्यामुळे मी एक ट्राइमिस्टर उशिरा म्हणजे जुलै ऐवजी सप्टेंबर १९७२ मध्ये माझ्या दुसऱ्या वर्षात पशुवैद्यकीय महाविद्यालयात सम्मिलित झालो. येथे मात्र चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होत सप्टेंबर १९७६ ला महाविद्यालयातून पदवीधर होऊन बाहेर पडलो, राज्य शासनाची अडीच वर्षाची नोकरी सोडून १९७८ ला मायक्रोबायॉलॉजीत एमव्हीएससी करण्यासाठी पुन्हा रुजु झालो आणि मार्च १९८१ मध्ये तेथेच स्टाफ बनलो. २००५ पर्यंत महाविद्यालयात नोकरी करुन मग आयसीएआर मध्ये उच्च पदावर निवड झाल्यामुळे पुन्हा एकदा बाहेर पडलो. २०१८ मध्ये वयाच्या ६२व्या वर्षी सेवानिवृत्त होऊन आता परभणी येथेच स्थायिक झालो आहे.

माझ्या आठवणी प्रमाणे सुरवातीला ऑगस्ट १९७२ मध्ये महाविद्यालयात फक्त चार शिक्षक होते आणि ते सगळे एकाच खोलीत बसावयाचे. डॉ एफ लेंभे, डॉ डी देशपांडे, डॉ डी आर पारगावकर आणि प्राचार्य डॉ बा ना करलगीकर. कृषी महाविद्यालयाच्या कृपेने सुरुवातीला त्यांच्या जुन्या इंजीनियरिंग विभागाच्या गोदामातील दोन खोल्या नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालयात मिळाल्या होत्या. बाजूला बरेच भंगार असलेल्या खोल्या होत्या. महाविद्यालयाचे एक कार्यालय होते त्यात नंतर आलेले स्टेनो एन एस पिल्ले यांची पत्नी स्टेनो म्हणून काम करत होती. छत आणि दरवाजा नसलेली एक पडकी मुतारी होती, जी नंतर बांधून कार्यालयाचे टॉयलेट बनवले. काही महिन्यांनंतर अजून दोन खोल्या मिळाल्या तेंव्हा प्राचार्य करलगीकरांना वेगळी खोली मिळाली. सध्या जे फार्म ऑफिस आहे ती आमची पहिली क्लासरुम. रेग्युलर बॅचचे क्लासेस तेथे होत. एकच वर्ग असल्यामुळे आमच्या रिपीट बॅचला अनेकदा झाडाखाली बसावे लागे. बहुतेक वेळा गफूर सरांसाठी एक खुर्ची आणि बाकीचे विद्यार्थी झाडाखाली गवतावर असे चित्र पाहायला मिळे.

महाविद्यालयात ॲनिमल हजबंडरी विभागात असलेले डॉ पी एम खेडकर हे विषय शिकवण्यापुरते येत असत. नंतर एकापाठोपाठ एक डॉ एम गफूर, डॉ एम एस देशपांडे आणि डेप्युटेशनवर डॉ एस व्ही पुराणिक, डॉ मुळे यांची नेमणूक झाली. लगोलग डॉ एल अंबेकर न्युट्रिशनसाठी आणि डॉ एम जी सबनीस मायक्रोबायोलॉजीसाठी आले. डॉ एम एन कुलकर्णी एक वर्ष उशीरा म्हणजे १९७३ ला आले कारण ते मुक्तेश्वर येथे पीएचडी करत होते. त्याच दरम्यान डॉ बी बी देशपांडे, डॉ के आर वाघ, डॉ एम के सावंत, डॉ पी भोकरे, डॉ पी जी साखरे, डॉ आर एस देशपांडे, डॉ के एस देशपांडे डॉ व्ही वाय कल्याणकर आले. डॉ उमेश शास्त्री त्यांच्या पीएचडीचा थिसिस सबमिट करुन मग रुजू झाले. डॉ एस के औरादकर, डॉ एम गफार आणि डॉ वाणी प्रसाद वडलामुडीही रुजू झाले आणि नंतर डॉ एम बी गुजर, डॉ. भूपसिंग, डॉ पंचभाई, डॉ अब्दुल समद, डॉ एम आय बेग आणि डॉ एम आय कुरेशी जॉईन झाले. एक सेवानिवृत्त प्राध्यापक डॉ गानू हेही पुनर्नियुक्तीनंतर येथे अनाटॉमी विभागात काही दिवस होते. सुरवातीला असोसिएट डीन प्राचार्य म्हणून डॉ बाबुराव करलगीकरांची तीन वर्षांसाठी नेमणूक झाली. नंतर या पोस्टसाठी इंटरव्ह्यू व्हायचे. मुलाखतीच्या दिवशी मात्र करलगीकर सर, गफूर सर आणि लेंभे सर कोट टाय सूट घालून घ्यायचे आणि मग आम्हाला कळायचे की आज इंटरव्यू! दोन तीन इंटरव्ह्यू नंतर गफूर सरांची प्राचार्य म्हणून निवड झाली आणि करलगीकर सर परत पंकृवि, अकोला अंतर्गत बोरगाव मंजू फार्मला निघून गेले.

त्याकाळी ही सगळी प्राध्यापक मंडळी फार साधी माणसं होती. एकाही प्राध्यापकाकडे स्वतःचे घर नव्हते. गफूर सर आणि कुलकर्णी सर तर रोज सायकलवर कॉलेजला यायचे. माझ्या आठवणीप्रमाणे त्यावेळी फक्त पारगावकर सरांकडे स्कूटर होती.

आमच्या बॅचचे वैशिष्ट्य असे की जवळपास ७०% कोर्सेस हे त्या विषयाचा तज्ञ नसलेल्या प्राध्यापकाने शिकवले होते उदाहरणार्थ बी एन करलगीकर सर फार्माकालॉजीचे आणि डी आर पारगावकर सर गायनेकचे प्राध्यापक, त्या दोघांनी फिजिओलॉजी शिकवले;, एफ लेंभे सर डेरी सायन्सचे प्राध्यापक, त्यांनी ऍनिमल मॅनेजमेंट शिकवले; एम गफूर सर परासिटॉलॉजी प्राध्यापक, त्यांनी बायोकेमिस्ट्री शिकवले; एम एस देशपांडे सर परासिटॉलॉजीचे, शिकवले ॲनोटॉमी; के एस देशपांडे सर जेनेटिक्सचे आणि पी जी साखरे सर मॅनेजमेंट विषयाचे प्राध्यापक, पण शिकवले गायनेकॉलॉजी; शास्त्री सर परासिटॉलॉजी तज्ञ, शिकवले पॅथोलॉजी; एम एन कुलकर्णी सर मायक्रोबायॉलॉजीचे प्राध्यापक, त्यांनी प्रिव्हेंटिव्ह मेडिसीन शिकवले. अर्थात त्यामुळे आमचे काही नुकसान झाले नाही कारण ही सर्व हुशार आणि मेहनती मंडळी होती. शिवाय सेल्फ स्टडीची चांगली सवयही लागली. एस के औरादकर, डी देशपांडे हे नवीन असूनही विषयप्रवीण होते. डॉ अब्दुल समद सारखा विषय तज्ञ आणि समजदार शिक्षक याचाही पॉलिक्लिनिकला फायदा झाला.

प्रॅक्टिकल साठी जास्त जागा उपकरणे नसल्यामुळे दर रविवारी खेडोपाडी वर्क कॅम्पला जावे लागायचे, खूप जनावरे हाताळायला मिळाली, पशुपक्षी लसीकरणापासून ते छोट्या-मोठ्या ऑपरेशनपर्यंत हात बसले. त्यामुळे ग्रामीण भागातील पशुउपचाराचे प्रश्न समजू लागले. डॉक्टर पी एम खेडकर यांनी पोल्ट्री मॅनेजमेंट शिकवताना पळती कोंबडी कशी पकडायची येथपासून ते व्यवसाय कसा करायचा हे "Earn while you learn" स्कीम चालवून शिकवले. या सगळ्याच गोष्टींचा पुढे खूप फायदा झाला. सोलापूर येथे १९७५मध्ये भरलेल्या विभागीय पशुपक्षी प्रदर्शनातील जजिंग कॉंपिटिशनमध्ये मुंबई आणि नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रथितयश टीम्सना हरवून आमच्या नवख्या महाविद्यालयाची टीम प्रथम क्रमांकावर आली.

डॉ गफूर सर एडीपी झाले आणि मग डॉ एम एन कुलकर्णी यांची साथ घेऊन तत्कालीन मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या प्रशासनाशी त्यांचे भांडण सुरू झाले. पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या सुविधा विद्यापीठाकडून सहजासहजी मिळत नसत. त्यासाठी ही जोडगोळी मुंबईत अनेकदा मंत्रालयात खेटे मारीत असे. डॉ व्ही एस खुस्पे कुलगुरू झाल्यानंतर परिस्थिती थोडी सुधारली नवीन इमारतीच्या बांधकामास गती मिळाली. या दोघांनी सुरुवातीला अनेक विकसित महाविद्यालयांना भेटी देऊन पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय अर्थात पॉलिक्लिनिकची बिल्डिंग हिसार मॉडेलवर काही बदल करत अतिशय वेगात बांधून काढली. दरवर्षीच्या ६० विद्यार्थ्यांसाठी १२० आसन क्षमता असलेले सुंदर लेक्चर हॉल बांधण्याची कल्पना त्यांचीच. तथापि पाच फेजमध्ये मंजूर झालेल्या प्रस्तावापैकी फक्त 3 फेज पुरताच पैसा उपलब्ध झाला. १९८० या वर्षात पशुरोग संशोधन केंद्राचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाला सादर करून त्याच वर्षी तो मान्य करून आणण्याची घटना या दोघांच्या कर्तृत्वाचा पुरावाच मानावा लागेल. १९८६ ला डॉ एम एन कुलकर्णी सरांना एडिपीचा कार्यभार सोपवून डॉ गफूर सर जम्मू काश्मीर येथील महाविद्यालयात डीन म्हणून गेले आणि मार्च १९८७ ला डॉ एम एन कुलकर्णी सरांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. डॉ बी बी देशपांडे सरांना अचानक चार्ज घ्यावा लागला. नंतर गफूर सर परत आले पण ते कुलकर्णी सरांसारख्या जिवलग मित्राच्या निधनाने खचून गेले होते. ते लवकरच सेवानिवृत्त झाले. बी बी देशपांडे सर नियमित प्राचार्य झाले. त्यांना खूप कठीण परिस्थितीत हे महाविद्यालय चालवावे लागले, पण त्यांचा शांत स्वभाव, कधीही चिडणारे त्यांचे व्यक्तिमत्त्व यामुळे महाविद्यालयास अनावश्यक संघर्ष किंवा अनागोंदी या दोन्ही गोष्टींचा संसर्ग झाला नाही. आर्थिक टंचाई आणि विद्यापीठातील कृषी शाखेचा वरचष्मा या दोन्ही गोष्टींचा महाविद्यालयास फटका मात्र बसला. असे असले तरीही शैक्षणिक दृष्ट्या हे महाविद्यालय केवळ महाराष्ट्रातच नव्हे देशात पुढारलेलेच राहिले.

माझ्या समजुतीप्रमाणे १९७६-८६ हे दशक हा या महाविद्यालयाचा सुवर्ण काळ होता. परभणीच्या व्हेटर्नरी पॉलिक्लिनिकचे त्या काळी झालेले नाव, सूक्ष्मजीवशास्त्र संघटनेचे (IAVMI) वार्षिक अधिवेशन आणि त्या निमित्ताने भारताच्या कानाकोपऱ्यातून आलेले जवळपास १५० वैज्ञानिक, ब्लुटंग या मेंढ्यांच्या रोगास कारणीभूत असणारे विषाणुंवरील संशोधन, रिंडरपेस्ट नामशेष होत असताना या विषाणुंवर येथे झालेले संशोधन आणि तत्कालीन आयव्हीआरआय डायरेक्टर डॉ सी एम सिंगसारख्या महान व्यक्तिमत्त्वाच्या या महाविद्यालयात झालेल्या दोन भेटी अशा अनेक घटनांचा उल्लेख येथे करणे आवश्यक आहे. वेळेची बंधने पाळता स्वत:ला महाविद्यालयीन कामात झोकून देणारे ३०-३२ प्राध्यापक यांच्या प्रामाणिकपणामुळे या महाविद्यालयाचा लौकिक फार दूरवर लौकर पसरला.

मला या महाविद्यालयाचा विद्यार्थी म्हणून खूप अभिमान वाटतो आणि या महाविद्यालय इमारतीपासून ते सगळ्या स्टाफपर्यंत सर्वांचा मी ऋणी आहे. अगदी सुरुवातीच्या काळातील शून्यातून उभारलेल्या या महाविद्यालयाचा एक जुना साक्षीदार म्हणून लिहिलेला हा लेख उपयुक्त ठरेल अशी अपेक्षा आहे. येथेच थांबतो.