परभणी पशुवैद्यक महाविद्यालयाच्या जडणघडणीत माझा खारीचा वाटा

डाॅ. डी. आर. पारगांवकर

MVSc, Ph.D, FRVCS (Sweden)

निवृत्त प्राध्यापक,

पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय,

परभणी.

1971 साली मी स्विडनहुन FRVCS ही उपाधी मिळवुन परत पशुवैद्यक महाविद्यालय, नागपुरला रुजू झालो. लगेच माझी बदली पशुवैद्यक पदव्युत्तर संस्था, अकोला येथे झाली. पुढे काही महिन्यातच मराठवाडा कृृषि विद्यापीठ तसेच पशुवैद्यक महाविद्यालय परभणीस स्थापन होणार असल्याचा शासन आदेश काढण्यात आला. नागपुर महाविद्यालयात डाॅ. करळगीकर, डाॅ गफ्फूर , डाॅ. एम.एन. कुलकर्णी, डाॅ.एम.एस.देशपांडे हे कार्यरत होते. हे सर्वजण एक दिवशी माझेकडे आले. आमच्या सर्वांची बदली पशुवैद्यक महाविद्यालय परभणीला करण्यात आली होती. आम्ही सर्वजण मा. बोंगीरवार कुलगुरु च्या निवासस्थानी पोहचलो, आमची संम्मती न विचारताच बदली करण्यात आल्याचे त्यांना सांगीतल्यावर ते एवढेच म्हणाले की. ’’तुम्हाला नको असेल तसा अर्ज द्या, पण तुम्ही त्या विभागाचे आहेत, तिथे नवीन काॅलेज येवू घातले आहे. अशावेळी तुम्ही लोकच तिथे जाऊन त्याची जडणघडण करणार नसाल तर दुसरे कोण करील’’? नंतर त्यांनी दिलेला चहा घेऊन व त्यांचे आभार मानून आम्ही परभणीस निघालो.

18 मे 1972 रोजी मराठवाडा कृृषि विद्यापीठ सोबतच पशुवैद्यक महाविद्यालयाची परभणीस स्थापना करण्यात आली. पहिल्या बॅचमध्ये 32 विद्यार्थी घेण्यात आले होते. प्रथम वर्षात लागणा-या अध्यापकांची अजून नेमणूक व्हायची होती, त्या बद्दलचा शासन आदेश अपेक्षीत होता. नंतर त्यासाठी प्रक्रीया होउन मुलाखती वगैरे झाल्यावर निवड झालेल्या व्यक्ती रुजू हेाण्यास बराच अवधी गेला. डाॅ. कलळगीकर सर आमचे प्राचार्य होते. त्यांचे आदेशानुसार प्रथम वर्षाचे अभ्यास क्रमासाठी लागणा-या विषयांचे वर्ग घेण्यास सुरुवात केली. महाविद्यालयास लागणारे बजेट ही सुरुवातीस तुटपूंजेच होते.

पुढे महाविद्यालयास इमारत, वस्तीगृृह, पशुसर्वचिकीत्सालय वगैरेसाठीही बजेटची तरतुद झाली, आराखडा तयार झाला. बांधकाम व्यवसायीकांची निवड करुन प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली. महाविद्यालयाच्या वास्तुतच प्राचार्यांचे कार्यालय इतर विभागासाठी नियोजन पुर्वक मांडणी करण्यात आली. विद्याथ्र्यासाठी व्याख्यान गृृह खरं म्हणजे 64 विद्यार्थी बसु शकतील असे हाॅलच वाटावेत अशी आदर्श व्यवस्था करण्यात आली. वर्गातील आसन व्यवस्था अर्धचंद्राकृृतीकार करण्यात आल्याने विद्याथ्र्यांना मध्यवर्ती लावलेल्या फळ्यांकडे पहाणे सोयीचे झाले. विद्याथ्र्यांना बसण्यासाठी आसन व्यवस्था अशी होती की, त्यांचे बाकडे हलवता येत नव्हते, समोरुन मागच्या बाजुला जात थोडया उंचावर सर्वांना अनायास शिक्षकाकडे लक्ष देत व्याख्यान ऐकणे सोयीेचे होते.

वसतिगृृहाची आखणीही अत्यंत नियोजन पुर्वक झाली विद्यूतीकरण कंत्राटदारास असे बजावण्यात आले होते की, प्रत्येक खोलीत अशी व्यवस्था करा की त्यातील विद्याथ्र्याने चुकून ’’हिटर’’ चा वापर केला अन फयूज उडालेच तर ते फक्त त्या खोलीपुरतेच असेल इतरांना अडचण होणार नाहीच, शिवाय चुक करणारा पकडलाही जाईल श्री. पेंडसे नावाचे निष्णात विद्यूत अभियंता मुंबईचे होते. ते मुंबईहुन येतांनाच त्यांचे प्रशिक्षीत वायरमनला घेउनच येत असत.

पशुसर्वचिकीत्सालयात पशुशल्यचिकीत्सा, औषधशास्त्रा व पशुप्रजनन विभागासाठी सोय करण्यात आली होती, तेथील शस्त्राक्रियागृृह तर अगदी लाजवाब म्हणता येईल असे झाले. विद्याथ्र्यांना ऑपेरेशन बघणे सोयीचे व्हावे म्हणुण गॅलरीही ठेवण्यात आली होती. विद्यार्थी वर्गातच असतील अन इकडे महत्वाचे ऑपेरेशन चालु असेल तर ’’सिसीटीव्ही’’कॅमेराद्वारे त्याचे चित्राण थेट वर्गातही पाठवता येऊ शकेल अशी व्यवस्था करण्यात आली. सर्व विभाग मिळुन एकच प्रशस्त बाहय पशुरुग्ण विभाग उपलब्ध होता. जनावराच्या तपासणीसाठी योग्य ती चोख व्यवस्था होती. सर्व विषयांचे अध्यापक असल्याने विद्याथ्र्यांना आजारी जनावरांच्या रोग, निदान व उपचारा विषयीही सविस्तर माहिती मिळत असे. एखादया विषयाचा तज्ञ उपस्थित नसला तर त्या विषयी माहिती, निदान व उपचारा बदल विद्याथ्र्यांना समजाउन सांगण्यात मला समाधान मिळत होते. अंतीम वर्षाच्या विद्याथ्र्यांना 3 बॅचेसमध्ये विभागुन त्यांना आठवडयातुन 3 दिवस ठरावीक खेडयातील पशुकित्सालयात बसने प्रशिक्षणासाठी नेण्यात येत असे. मी ही आठवडयातुन एक दिवस विद्याथ्र्यांना काॅलेज बसने घेऊन जात असे. स्थानिक पशुधन विकास अधिका-यांना अडचण होणार नाही याची काळजी घेत, आलेल्या रोगी जनावराबद्दल सर्व माहिती विद्याथ्र्यांना दिल्याने समाधान मिळत गेले.

पशुशल्यचिकीत्सा विभागात डाॅ. भोकरे, डाॅ. पंचभाई व डाॅ.सरकटे तर औषधशास्त्राविभागात डाॅ. समद, डाॅ.भुपसिंग वगैरे निष्णात अध्यापक उपलब्ध होते. पशुप्रजनन विभागात मात्रा मी एकटाच कित्येक वर्ष कार्यरत होतो, पण नंतर डाॅ.बक्षी व डाॅ.मार्कंडेय सारखे मेहनती निष्णात सहाध्यायी मला येऊन मिळाल्याने माझे काम खुपच सुकर झाले.

विद्यार्थी अंतीम वर्षात आले की, माझ्या पहिल्याच तासात मी त्यांना स्पष्ट कल्पना देत असे की ’’महाविद्यालयाच्या लाल कंधारी गायी तसेच पशुसर्वचिकीत्सालयात येणा-या गायी म्हशींची तपासणी करण्यास तुम्हाला पुर्ण परवानगी असेल. भरपुर अभ्यास करा पण जो पर्यंत तुम्ही मला अचुक निदान देण्याच्या योग्यतेचे होणार नाहीत तो पर्यंत मी तुम्हाला काॅलेजच्या बाहेर पडु देणार नाही’’. एकुणच माझ्या थोडया कडक स्वभावामुळे मी बदनाम झालो असेल. वार्षीक गॅदरींगच्या कार्यक्रमात मला ’’हिटलर’’, ’’याहयाखान’’ वगैरे सारखे शेला पागोटे मिळाले आहेत ! विद्याथ्र्यांना भावी आयुष्यात कुठलीच अडचण न येता त्यांनी यशस्वीपणे मार्गक्रमण करीत राहावे, हीच माझी भावना असल्याचे त्यांना नंतर जाणवतही होते.

विद्याथ्र्यांना पुढील आयुष्यात भेडसावू शकतील अशा दोन प्रमुख समस्या पहिली म्हणजे माज अभाव व दुसरी सतत उलटण्याची समस्या या दोन्ही प्रकरणावर मी त्यांच्याशी तासनतास संवाद साधत असे. विद्यार्थीही प्रचंड मेहनत घेऊन अभ्यास करुन घवघवीत यश मिळवत आहेत. अनेक विद्यार्थी संचालक, उपसंचालक, अधिष्ठाता, मुख्य कार्यकारी अधिकारीए पोलीस कमिशनर, जिल्हाधिकारी वगैरे उच्च पदस्थ झाले असल्याचे बघुन मला अतीव समाधान लाभले व मला त्यांचा सार्थ अभिमानही वाटतो आहे.

प्राचार्य डाॅ. गफ्फुर, डाॅ.एम.एन.कुलकर्णी व नंतर डाॅ.बी.बी.देशपांडे यांचे समवेत कार्यरत राहुन वयाच्य 60 व्या वर्षी सेवानिवृृत्त झालेा. काॅलजेशी मी इतका एकरुप झालो होतो की, निवृृत्तीच्या निरोप समारंभ वेळी माझे मनोगत व्यक्त करताना एखादी कवी कल्पना वाटावी अशी एक भावना व्यक्त करतांना मी म्हणालो होतो की ’’मरणोत्तर नेत्रादान करण्यासाठी मी फॅार्म भरलेला आहे. माझे डोळे कुणाला मिळाले आहेत हे जर तुम्हाला चुकुन कळाले तर त्या व्यक्तीला महाविद्यालयात अवश्य घेऊन या परत एकदा माझ्या डोळयांनी केलेली प्रगती बघुन मी तृृप्त होऊ इच्छितो.’’

महाविद्यालयाने सुवर्णजयंती वर्षात पदार्पण केले आहे. काॅलेजचे प्राचार्य, सर्व अध्यापक, इतर कर्मचारी वर्ग भरभराट होऊन अखंड प्रगती होत राहेा ही सदिच्छा !!

धन्यवाद !